औरंगाबाद- जिल्ह्यात शिवसेना-भाजपा युती, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसह तिसर्या आघाडीचीही
मोठी ताकद लोकसभा मतदारसंघात आहे. विशेषतः डावे पक्ष शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी
कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी, भारिप बहुजन महासंघ, लालबावटा पक्ष, समाजवादी विचारसरणीची मंडळी मिळून तिसरी आघाडी आहे.
लोकसभेची निवडणूक पाच महिन्यावर आलेले असतानाही तिसरी आघाडीची मोट बांधण्यासाठी
कुणीही पुढाकार घेताना दिसून येत नाही. भारिप बहुजन महासंघ-एमआयएमच्या
एकत्रीकरणाची चर्चा होत असली तरी डावे पक्ष, संघटना व
समाजवादी मंडळी एमआयएमला स्वीकारतील का? यावरुन तिसर्या
आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे. तिसर्या आघाडीचे चित्र स्पष्ट नसल्याने
उमेदवाराच्या नावाचा विषय काढणेच अवघड आहे.
औरंगाबाद जिल्हा लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप या
हिंदुत्ववादी विचारसरणीला मानणारा मतदारांचा मोठा वर्ग आहे. तसेच धर्मनिरपेक्ष
शक्ती म्हणजे काँग्रेसला मानणाराही मोठा वर्ग आहे. या शिवाय काँग्रेस आणि
सेना-भाजपाचा पक्षाच्या धोरणाला सातत्याने विरोध करुन त्यांचे विचार झुगारुन
लावणारी, दलित, श्रमिक, कामगारांची बहुजनांची एक शक्ती आहे. तिसर्या आघाडीच्या
नावाने ही शक्ती दरवेळेस निवडणुकीला सामोरे जात असते. पण या वेळेस मात्र या तिसर्या
आघाडीची शक्यता धुसर होताना दिसून येत आहे.
तिसर्या आघाडीत भारिप बहुजन महासंघाशिवाय डाव्या
विचारसरणीचे पक्ष व समाजवादी मंडळी यांचा समावेश असतो. यावेळेस भारिप नेते प्रकाश
आंबेडकर यांनी वेगवेगळ्या पक्षांना सोबत घेऊन वंचित आघाडी उभी केली आहे. या आघाडीत
एमआयएम या पक्षाला सोबत घेतले आहे. मुस्लिम कट्टरवादी पक्ष म्हणून एमआयएमची ओळख
आहे. एमआयएमच्या नेत्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये करुन जाती-जातीत तेढ निर्माण
करण्याचे काम केलेले आहे. तिसर्या आघाडीतील डावे व समाजवादी मंडळी एमआयएमचा
स्वीकार करतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभेच्या निवडणुका
तोंडावर आलेल्या असतानाही तिसर्या आघाडीत हालचाली नसल्याने तिसरी आघाडी वंचित
आघाडीत विलीन होते की काय हे आता पहावे लागणार आहे. डावे जर वंचित आघाडीत गेले तर
त्यांचा उमेदवार कोण राहणार याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.










